
दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आज निवृत्तीची घोषणा केली आहे. 6 जून रोजी कुवेत विरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. छेत्रीचा हा शेवटचा सामना कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे.
भारतासाठी सर्वाधिक गोल, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू सुनील छेत्री आहे. भारताकडून छेत्रीने 94 गोल केले. गोल करण्यामध्ये जगात चौथ्या स्थानी आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो 128 गोलसह प्रथम स्थानावर असून इराणचा अली दायी 108 गोलसह दुसऱ्या स्थानी तर अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी 106 गोलसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. छेत्रीने मार्चमध्ये आपला 150 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 2007, 2009 आणि 2012 मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय संघात सुनील छेत्रीचे मोलाचे योगदान राहिले आहे.
त्याचप्रमाणे दक्षिण आशियाई महासंघ म्हणजेच सॅफ अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 2011, 2015 आणि 2021 मध्ये जेतेपद मिळवून देण्यात सुनील छेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. 2008 साली सुनील छेत्रीच्या जोरावर भारताने एएफसी चॅलेंज चषक पटकावला. यामुळे 27 वर्षात पहिल्यांदाच भारताला 2011 साली एएफसी आशियाई चषक स्पर्धेत खेळता आले. 2002 मध्ये मोहन बागान संघातून क्लब फुटबॉलमध्ये पदार्पण केलेल्या सुनिल छेत्रीने अमेरिकेत 2010 मध्ये मेजर लीग फुटबॉल स्पर्धेत टीम कन्सास सिटी विझाडर्सकडून छाप पाडली.
7 वेळा एआयएफएफचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या छेत्रीने इस्ट बंगाल, डेम्पो या संघांसह आयएसएलमध्ये मुंबई सिटी एफसी आणि बंगळुरू एफसीकडून चमकदार खेळ केला. छेत्रीने बंगळुरू एफसी संघाकडून खेळताना आय-लीग, आयएसएल आणि सुपर चषक स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे.