वनलायनर चालू घडामोडी नोट्स 25 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 25 November

स्वदेशी बनावटीच्या सर्वात वेगवान ‘तेजस’ या लढाऊ विमानातून प्रधानमंत्र्यांनी केले उड्डाण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्वदेशी बनावटीच्या सर्वात वेगवान तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. बंगळूरूमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिल्यानंतर त्यांनी हे उड्डाण केले. या भेटीदरम्यान, त्यांनी तेजस जेट्सच्या उत्पादनाचा समावेश असलेल्या एचएएलच्या उत्पादन सुविधांचा आढावा घेतला. भारतीय हवाई दलाकडून 83 तेजस विमानांच्या खरेदीची योजना प्रस्तावित आहे. सध्या एचएएल वार्षिक आठ विमानांची निर्मिती करत असून त्यांची प्रतिवर्षी 16 विमाने उत्पादित करण्याची क्षमता आहे.

केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या हस्ते राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार प्रदान ग्रामीण भागात दुधाचा पुरेपूर वापर होण्यासाठी देशातल्या प्रत्येक गावात दुग्ध सहकारी संस्था असायला हव्यात, असं मत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी व्यक्त केलं. गुवाहाटी इथं “राष्ट्रीय दूध दिवस” या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते. “भारतातल्या श्वेत क्रांतीचे जनक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या शतकोत्तर दुसऱ्या जयंतीनिमित्त हा दुग्ध दिवस साजरा केला जातो. पशुधनविकास क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कारही रुपाला यांनी प्रदान केले. या पुरस्कारविजेत्यांमधे नाशिकचे राहुल खैरनार यांचा समावेश आहे.

खेलो इंडिया पॅरा गेम्ससाठीचा शुभंकर, लोगो, जर्सी आणि गीताचं अनावरण
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्ली इथं खेलो इंडिया पॅरा गेम्ससाठीचा शुभंकर, लोगो, जर्सी आणि गीताचं अनावरण केलं. खेलो इंडिया पॅरा गेम्स १० ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ३२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतले एक हजार ४०० हून अधिक जण या स्पर्धांमध्ये भाग घेतील. 

इफ्फीच्या सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी 3 भारतीय चित्रपटांसह एकूण 15 चित्रपट स्पर्धेत
गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी 15 चित्रपट स्पर्धेत आहेत. त्यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. रिषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट ‘कांतारा’, सुधांशु सरियाचा हिंदी चित्रपट ‘सना’ आणि मृदुल गुप्ता दिग्दर्शित कार्बी भाषेतला ‘मिरबेन’ हे भारतीय चित्रपट या स्पर्धेत आहेत. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षकांचं मंडळ विजेत्या चित्रपटाची निवड करणार आहे. विजेत्याला ४० लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या रकमेचं निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये समान वाटप केलं जाईल. 

इफ्फीमध्ये प्रतिष्ठित ICFT-UNESCO गांधी पदकासाठी 10 चित्रपट स्पर्धेत
गोव्यात सुरु असलेल्या, ईफ्फी या  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  या वर्षीच्या प्रतिष्ठित ICFT-UNESCO गांधी पदकासाठी  दहा चित्रपट स्पर्धेत आहेत. सहिष्णुता, आंतरसांस्कृतिक संवाद आणि शांततेची संस्कृती, ही युनेस्को कडून प्रसार होणारी मूल्य प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला, हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी निवडलेल्या 10 चित्रपटांपैकी, राकेश चतुर्वेदी ओमचा ‘मंडली’, विष्णू शशी शंकर यांचा ‘मलिकापुरम’ आणि सयंतन घोसनचा ‘रवींद्र काव्य रहस्य’ हे तीन भारतीय चित्रपट या शर्यतीत आहेत. येत्या 28 नोव्हेंबरला इफ्फीच्या समारोप समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ICFT पॅरिस आणि UNESCO यांनी सुरु केलेलं हे गांधी पदक म्हणजे, महात्मा गांधींच्या शांतता आणि अहिंसेच्या विचारांचं उत्कृष्ट प्रतिबिंब उमटलेल्या चित्रपटाला IFFI मध्ये सादर केलेली मानवंदना आहे. 1994 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली आहे.दरम्यान, 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या स्पर्धेत “ओढ” या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment