वनलायनर चालू घडामोडी नोट्स 24 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 24 November

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 24 नोव्हेंबर

धर्मेंद्र प्रधान यांनी केली राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था – NSTI प्लसची पायाभरणी
ओडीशात जतनी येथे, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था – NSTI प्लसची पायाभरणी केली. ही संस्था प्रादेशिक स्तरावरच्या मागणीनुसार,उच्च दर्जाचं कौशल्य प्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देईल.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर,मंत्रालय उमेदवारांना,इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ – इग्नू, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग आणि राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था –NISBUD यांच्या सहकार्यानं प्रमाणपत्र देखील प्रदान करेल.ही संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्यरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट,नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर यासारख्या संस्थांशी संलग्न असेल.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज करणार जागतिक व्यावसायिक सनदी लेखापाल परिषदेचं उद्घाटन
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज गुजरातमधल्या गांधीनगर येथे जागतिक व्यावसायिक सनदी लेखापाल परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. या तीन दिवसांच्या परिषदेमध्ये 25 हून अधिक देशांमधले 4,000 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. लेखापाल व्यवसायाच्या भविष्याबद्दल या परिषदेत चर्चा होणार असून 30 पेक्षा अधिक सत्रांद्वारे तज्ज्ञ उपस्थितांशी संवाद साधतील. या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे अध्यक्ष अनिकेत तलाटी हेदेखील उपस्थित राहतील.

रिझर्व बँकेने अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार सोपवला प्रशासकांच्या हाती
रिझर्व बँकेनं अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार वर्षभरासाठी प्रशासकांच्या हाती सोपवला आहे. अभ्युदय बँकेच्या व्यवस्थापनातल्या त्रुटींमुळं बँकेनं हा निर्णय घेतला असला तरी बँकेच्या व्यवहारांवर कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळं बँकेचं कामकाज प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सुरू राहील, असं रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे.  भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची नेमणूक या बँकेवर प्रशासक म्हणून केली आहे. तसंच त्यांना सहाय्यासाठी सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यात कॉसमॉस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे आणि सनदी लेखापाल महेंद्र छाजेड यांचा समावेश आहे.

● नवी दिल्लीत पोलाद क्षेत्रातील उत्पादनांची नाममुद्रा तयार करण्यासंदर्भातील पहिल्या बैठक संपन्न
जागतिक बाजारपेठेत पोलाद क्षेत्रातील उत्पादनांची नाममुद्रा तयार करण्यासंदर्भातील पहिल्या उपक्रमावर पोलाद मंत्रालयाच्या सल्लागार समितीची काल बैठक झाली. नवी दिल्लीत काल झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते. शिंदे यांनी भारतीय पोलाद उद्योगाला चालना देण्याचा मुद्दा मांडत प्रधानमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित केलं. भारतीय पोलाद उत्पादनं अधिक आकर्षक बनवण्याबरोबरच,मालाची प्रमाणित गुणवत्ता सुनिश्चित करण्यावरही या चर्चेत भर देण्यात आला आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment