● ‘अँड्रो ड्रीम्स’ या चित्रपटीय इतिवृत्ताने 54व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ
‘अँड्रो ड्रीम्स’ या 63 मिनिटांच्या चित्रपटीय इतिवृत्ताने 54व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ केला. या प्रायोगिक माहितीपटाच्या निर्मितीची धुरा महिला दिग्दर्शक, महिला निर्माती आणि महिला कलाकार यांच्या त्रिमूर्तीने सांभाळली आहे. “हा चित्रपट म्हणजे मणिपूरच्या लोकांच्या कोणी कधी ऐकून न घेतलेल्या आणि इतर माध्यमांमध्ये प्रतिनिधित्व न मिळू शकलेली कथा आहे.” असे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिग्दर्शिका लाँगजॅम यांनी सांगितले. इफ्फीमध्ये यावर्षी 25 फीचर आणि 20 नॉन-फीचर चित्रपट दाखवले जाणार आहेत. भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ष 1978 मध्ये इफ्फीच्या छत्राखाली भारतीय पॅनोरमा विभागाची सुरुवात करण्यात आली.
● वीर दास यानं जिंकला सर्वोत्तम स्टँडअप कॉमेडियनसाठीचा पुरस्कार
प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचा असलेल्या अॅमी पुरस्कारांमध्ये यावर्षीचा सर्वोत्तम स्टँडअप कॉमेडियनसाठीचा पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.वीर दासच्या नेटफ्लिक्सवरील ‘वीर दास लँडिंग’कार्यक्रमासाठी हा पुरस्कार विभागून दिला आहे. ‘डेरी गर्ल्स सीझन ३’ या विनोदी कार्यक्रमालाही अॅमी पुरस्कार मिळला आहे. या सोहळ्यात निर्मिती दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार चित्रपट निर्माती एकता कपूर यांना देण्यात आला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. कला आणि मनोरंजन विश्वात महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल एकता कपूर यांना सन्मानित करण्यात आलं.
● 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीचा समारोप 28 नोव्हेंबर होणार
गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीचा समारोप 28 नोव्हेंबर होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमाला हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माता मायकेल डग्लस उपस्थित राहणार असून ते सर्वांशी संवाद साधणार आहेत.याच कार्यक्रमात डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.
● इंफाळ या क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेवरून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नव्याने विकसित केलेल्या देशी बनावटीच्या इंफाळ या क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेवरून नौदलानं आज पहिल्यांदाच ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वीच एखाद्या नौकेवरून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. जहाजाच्या लढाऊ क्षमतेबरोबरच भारताची जहाजबांधणी क्षमता, स्वदेशी शस्त्रांची विश्वासार्हता याची चाचपणीही चाचणीदरम्यान करण्यात आली.
● पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा येत्या 10 डिसेंबरपासून दिल्लीत होणार
पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स म्हणजे दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धां येत्या 10 ते 17 डिसेंबर दरम्यान होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काल ही माहिती दिली. नवी दिल्लीत विविध ठिकाणी होणार असलेल्या या स्पर्धांमध्ये 7 क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. या क्रीडाप्रकारांमध्ये 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले 1350 हून अधिक स्पर्धक भाग घेतील.
● इंडोनेशिया येथे आजपासून आसियान-भारत भरड धान्य महोत्सवाचं आयोजन
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहयोगाने, आसियान मधील भारतीय मिशन अंतर्गत इंडोनेशिया येथे आज पासून 26 नोव्हेंबर या कालावधीत आसियान-भारत भरड धान्य महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला आहे. इंडोनेशियामध्ये दक्षिण जकार्ता येथील कोटा कासाब्लांका मॉल या खरेदीच्या महत्वाच्या ठिकाणी महोत्सवाचे उद्घाटन सत्र पार पडले. या महोत्सवाचा भाग म्हणून भरड धान्यांवर केंद्रित प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, यामध्ये भरड-धान्य आधारित शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), स्टार्टअप्स आणि भारतीय शेफ्स यांचा सहभाग आहे.