1 एप्रिल 2024 चालू घडामोडी नोट्स
● RBI स्थापना होऊन 90 वर्षे पूर्ण
आरबीआयच्या 90 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारंभात आयोजित करण्यात आला होता. यावेळी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास उपस्थित होते. RBI कायदा 1934 अंतर्गत RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना 1 एप्रिल 1934 रोजी करण्यात आली.
● अहमदनगरमध्ये मेकॅनाइज्ड इन्फंट्री केंद्र आणि शाळेचा स्थापना दिन
मेकॅनाइज्ड इन्फंट्रीने 2 एप्रिल 2024 रोजी आपला 45 वा स्थापना दिन पारंपारिक उत्साहात साजरा केला. या प्रसंगी अहमदनगर येथील मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूलने केंद्रातील युद्ध स्मारकावर शूरवीरांना पुष्पचक्र अर्पण केले. ब्रिगेडियर रसेल डिसोझा, कमांडंट मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल यांनी पुष्पचक्र अर्पण केले. मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर 2 एप्रिल 1979 रोजी स्थापन करण्यात आले. आणि 17 सप्टेंबर 2021 रोजी MIC&S म्हणून पुनर्रचना करण्यात आली. हे केंद्र पायदळ लढाऊ वाहने आणि मेकॅनाइज्ड इन्फंट्री संकल्पनांशी संबंधित सर्व तांत्रिक आणि सामरिक बाबींचे प्रमुख केंद्र आहे.
● नव्या करप्रणालीत कोणताही बदल नाही.
चालू आर्थिक वर्षासाठी नव्या करप्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. वैयक्तिक करदात्यांसाठी एक एप्रिल 2024 पासून नवी करप्रणाली लागू करण्यात आली असून, जुन्या करप्रणालीतील, विविध सवलती आणि कपातीचा लाभ नव्या प्रणालीत उपलब्ध नाहीत. नवी करप्रणाली ही ‘डीफॉल्ट’ करप्रणाली आहे. करदाते त्यांच्यासाठी फायदेशीर वाटणारी जुनी किंवा नवी करप्रणाली निवडू शकतात. नव्या करप्रणालीमधून बाहेर पडण्याचा पर्याय विवरणपत्र भरेपर्यंत उपलब्ध आहे.
● नव्या आर्थिक वर्षात आर्थिक सेवांमध्ये महत्वपूर्ण बदल.
नव्या आर्थिक वर्षात (2024-25) विविध आर्थिक सेवांमध्ये आजपासून बदल झाले आहेत. यामध्ये फास्टटॅग केवायसी, आधार क्रमांकाशी पॅन क्रमांक जोडणे, भविष्य निर्वाह निधी खाते हस्तांतरण, ई-वाहनांसाठीचे अनुदान, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती आदींचा समावेश आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून 32 रुपयांनी स्वस्त झाला.
● 18 व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे पुण्यात आयोजन.
पं. जितेंद्र अभिषेकींसारख्या चतुरस्त्र कलाकाराला आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने आयोजित आणि अभिषेकी बुवांनी गायलेल्या, संगीतबद्ध केलेल्या, रचलेल्या रचना, बंदिशी, पदे, गीते यांचे प्रभावी सादरीकरण असलेला 18 वा पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव नुकताच पुण्यात पार पडला.
● राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने रेल्वे संघावर, तर महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघावर विजय साकारत झळाळता करंडक पटकावला. पुरुषांचे हे 39 वे, तर महिलांचे 25 वे जेतेपद ठरले. नवी दिल्ली येथील करमाळी सिंग क्रीडांगण येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने डबल धमाका केला. गेल्या काही वर्षांतील रेल्वेचा दबदबा या वर्षी महाराष्ट्राने मोडून काढला. या वर्षी महाराष्ट्राने तिन्ही विभागांत विजेतेपद मिळवताना एकूण सहा अजिंक्यपद मिळवली. यामध्ये सब ज्युनिअर गटातील दोन व ज्युनिअर गटातील दोन व खुल्या गटातील दोन अशा एकूण सहा विजेतेपदांचा समावेश आहे.
● 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चुकीची माहिती खोडून काढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर’ केले सुरु
सहज सोप्या स्वरूपात निवडणुकीसंबंधी विश्वासार्ह आणि खरी माहिती आता एका बटणाच्या क्लिकवर चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची सचोटी टिकवून ठेवण्यासाठी, केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुका 2024 चा एक भाग म्हणून ”मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर’ सुरु केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे आज या उपक्रमाचा प्रारंभ केला. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (https://mythvsreality.eci.gov.in/ ) ”मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर’ जनतेसाठी उपलब्ध आहे. खोटी माहिती खोडून काढून खरी माहिती समोर आणण्यासाठी तसेच नवीन एफएक्यू (वारंवार विचारले जाणारे प्रश्न ) समाविष्ट करण्यासाठी रजिस्टरचे तथ्यात्मक मॅट्रिक्स नियमितपणे अपडेट केले जातील. निवडणूक प्रक्रियेचे चुकीच्या माहितीपासून रक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये ‘मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर’ हा एक मैलाचा दगड ठरेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत.