8 मार्च चालू घडामोडी नोट्स
राष्ट्रीय घडामोडी
देशभरात 35 नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटन
दिव्यांगजनांचं बळकटीकरण आणि पुनर्वसनाच्या दृष्टीनं सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी देशभरात ३५ नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटन केलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर विविध क्षेत्रांमध्ये दिव्यांग नागरिकांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करून दिव्यांगांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही डॉ. कुमार यांनी दिली. ही ३५ केंद्रं मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिश, त्रिपुरा, महाराष्ट्र, आसाम, नागालँड आणि मणिपूरमध्ये आहेत. दिव्यांगांसाठी अत्यावश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना दूरवर प्रवास करावा लागू नये, हा यामागचा उद्देश आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. सुधा मूर्ती यांची नियुक्तीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हटले आहे. सुधाजींनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेलं काम प्रेरणादायी आहे.
संरक्षण घडामोडी
भारतीय वायू दलाच्या चार युनिट्सना ‘प्रेसिडेंट्स स्टँडर्ड अँड कलर्स’ सन्मान प्रदान
उत्तर प्रदेशात हिंडन इथल्या भारतीय वायू दलाच्या तळावर वायुदलाच्या चार युनिट्सना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रेसिडेंट्स स्टँडर्ड अँड कलर्स हे सन्मान प्रदान केले. भारतीय वायुदलाच्या २२१ स्क्वॉड्न आणि ४५ स्क्वॉड्रन, या दोन पथकांना, त्यांनी प्रेसिडेंट्स स्टँडर्ड हा सन्मान प्रदान केला. प्रेसिडेंट्स स्टँडर्ड अँड कलर्स सन्मान, हा कुठल्याही सशस्त्र दलाच्या पथकासाठी सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. युद्ध आणि शांतता या दोन्ही काळात, भारतीय वायूदलानं राष्ट्रासाठी बजावलेल्या असामान्य सेवेची ओळख म्हणून, पथकांना १८ वर्षांच्या सेवेनंतर प्रेसिडेंट्स स्टँडर्ड, तर २५ वर्षांच्या सेवेनंतर प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कार प्रदान करण्यात येतो, असं भारतीय वायू दलानं म्हटलं आहे
आर्थिक घडामोडी
नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेटाबेसचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन
देशाच्या विकासात सहकारी संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, त्यांचं काम अधिक सुलभ करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे,असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी आज नवी दिल्लीत, नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेटाबेस या राष्ट्रीय सहकार विषयक माहितीसंचाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. या डेटाबेसमध्ये ८ लाखांहून अधिक सहकारी संस्थांची माहिती असून, यामुळे कार्यक्षम संवाद साधणे आणि सहकार क्षेत्रा अंतर्गत संपूर्ण माहितीअंती निर्णय घेण्याची सुविधा यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
नेपाळमध्येही भारताच्या UPI सेवेला मान्यता
भारताच्या युनिफाईड पेमेंटस इंटरफेस अर्थात युपीआयची सुविधा आता नेपाळमध्ये दिली जाणार आहे. NPCIची उपकंपनी आंतरराष्ट्रीय पेमेंट लिमिटेड आणि नेपाळची फोनपे पेमेंट सुविधेनं भारताच्या UPI सेवेला मान्यता दिली आहे. भारत आणि नेपाळमधील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी UPI आता थेट वापरता येणार आहे. यामुळे नेपाळला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना लाभ मिळणार आहे. UPI आणि नेपाळची फोनपे दोन्ही देशांमधील QR-कोड-आधारित व्यक्ती-ते-व्यापारी अर्थात (P2M) व्यवहार सोप्या आणि सुलभ व्यवहारांसाठी सज्ज आहेत. नेपाळमध्ये 30% पर्यटक हे भारतीय आहेत.
महाराष्ट्र घडामोडी
कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण
कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचं अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. यामुळे राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादनं आणि शेतमालाला आता डिजिटल ई-कॉमर्सचा मंच मिळाला आहे. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार टपाल विभाग यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अपद्वारे केला जाणार आहे.