6 March Current Affairs Notes | 6 मार्च चालू घडामोडी नोट्स

6 मार्च चालू घडामोडी नोट्स

राष्ट्रीय घडामोडी

पाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग सुरु
पाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग आजपासून सुरु झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोलकाता इथं या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्र्यांनी नंतर शालेय विद्यार्थ्यांसमवेत या मेट्रोमधून प्रवासाचा आनंद लुटला.गंगा नदीच्या पात्राखालून जाणाऱ्या ईस्ट – वेस्ट मेट्रो प्रकल्पातला  हा पहिला मार्ग आहे. देशात आजवर सर्वात खोल खणलेला हा भुयारी मार्ग असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांनी एकूण 15 हजार 400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमीपूजन आणि लोकार्पण केले.
महाराष्ट्रात पुणे मेट्रोच्या पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते निगडी, या मार्गाचं भूमीपूजन त्यांनी केलं. तसंच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, मार्गावरच्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.

जलशक्ती मंत्रालयाचा बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेशी एक महत्त्वाचा करार
जलशक्ती मंत्रालयानं बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेशी एक महत्त्वाचा करार केला आहे. या कराराअंतर्गंत देशातील राष्ट्रीय संस्थांचा दर्जा जागतिक पातळीवरील संस्थांच्या दर्जाच्या करण्याचा तसंच धरणांच्या सुरक्षेत संपूर्णत: भारतीय बनावटीचं तंत्रज्ञान वापरण्याला प्रोत्साहन देण्यासाठी धरणांसाठी इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डॅम- ICED (आयसीईडी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ICED केंद्र जलशक्ती मंत्रालयासाठी तांत्रिक बाबींमध्ये मदत करेल. तसंच  देशातील आणि परदेशातील धरणांची पाहणी, त्यांच्या उभारणी तंत्रज्ञानाचा अभ्यास करत काही सूचना करेल. ICED केंद्राच्या स्थापनेसाठी तसंच सुसज्ज प्रयोगशाळांच्या स्थापनेसाठी 118 कोटी पाच लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. या केंद्रामुळे देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल, असं मत जलशक्ती मंत्रालयाचे सचिव देबश्री मुखर्जी यांनी व्यक्त केले.

संरक्षण घडामोडी

दारुगोळा, शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र वाहक जहाज LSAM 19 भारतीय नौदलात सामिल
दारुगोळा, शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र वाहक पाचवं जहाज LSAM 19 भारतीय नौदलात काल समाविष्ट करण्यात आलं. हा सोहळा मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये कॅप्टन आशुतोष यांच्या उपस्थितीत झाला. अशा 11 जहाजांच्या बांधणीसाठी  केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने मार्च 2021 मध्ये ठाणे इथल्या मेसर्स सूर्यदिप्ता प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत  करार केला होता. या बार्जमुळं भारतीय नौदलाच्या कार्यक्षमता वाढतील आणि नौदलाला सामान किंवा दारूगोळा वाहून नेण्याची सुविधा सोपी होणार आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान आणि भारतीय नौदलाच्या नियमांना अनूसरुन जहाजांची बांधणी करण्यात आली आहे. अशी माहिती काल जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. 

आर्थिक घडामोडी

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच 74 हजार अंकांच्या पातळीवर
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदाच ७४ हजार अंकांची पातळी ओलांडली. सुरुवातीला घसरण झालेल्या देशातल्या शेअर  बाजारात दुपारनंतर तेजी आली. दिवसअखेर सेन्सेक्स ४०९ अंकांची वाढ नोंदवत ७४ हजार ८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही आज दिवसभरात नवी उंची गाठली. दिवसअखेर निफ्टी ११८ अंकांची वाढ नोंदवून २२ हजार ४७४ अंकांवर बंद झाला. बँकांचे समभाग तेजी पुढे घेऊन जाण्यात आघाडीवर होते

आंतरराष्ट्रीय घडामोडी

संयुक्त अरब अमिरातीने भारतीय कामगांरासाठी जाहीर केले जीव रक्षक वीमा कवच
संयुक्त अरब अमिरातीने भारतीय कामगांरासाठी आर्थिक संरक्षण देणारी जीव रक्षक कवच विमा योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे नैसर्गिक मृत्यूसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकंदर 35 लाख भारतीय राहतात. यापैकी सुमारे 65 टक्के भारतीय हे विविध क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत. हा गट तिथल्या स्थलांतरित कामगारांच्या सर्वांत मोठ्या गटांपैकी एक आहे. या महिन्याच्या 1 तारखेपासून ही योजना लागू करण्यात आली असून LPP मध्ये दर वर्षी 37 दिरहाम पासून किमान प्रीमियम्ससह विविध विमा रकमेचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
2022 मध्ये दुबईतल्या भारतीय वाणिज्य दूतावासात एकंदर 1,750 मृत्यू प्रकरणं नोंदवली गेली, त्यापैकी अकराशे कामगार होते. तर गेल्या वर्षी एकंदर 1,513 प्रकरणांपैकी सुमारे 1 हजार कामगारांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये मृत्यूचं कारण नैसर्गिक आहे.

महाराष्ट्र घडामोडी

वांद्रे कुर्ला संकुलामधून धावणार ‘पॉड टॅक्सी’
मुंबईत वांद्रे ते कुर्ला स्थानकांदरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून ‘पॉड टॅक्सी’ धावणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मान्यता दिली. सहा प्रवाशांची क्षमता असलेल्या या टॅक्सी, कमाल 40 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार आहेत. 

राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत आयआयटी-मुंबईसोबत सामंजस्य करार
राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत राज्य शासन आणि मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेदरम्यान काल सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याकरता मिशन ड्रोन राबवण्यात येणार आहे. या मिशनच्या प्रकल्पांतर्गत ५ वर्षासाठी २३ हजार ८६३ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. तर आयआयटी, मुंबईला 15 हजार 181 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे

देशातल्या पहिल्या ‘फुले अमृतकाळ’ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचं धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागानं विकसित केलेल्या, देशातल्या पहिल्या ‘फुले अमृतकाळ’ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचं लोकार्पण आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वातावरणीय बदलामुळे विविध नैसर्गिक आपत्ती वारंवार येत असतात. त्यामुळे पशुधनासाठी चारा आणि पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होतो, तसंच जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होतो. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांना विविध पद्धतीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातील, असे मुंडे यांनी सांगितले. हे ॲप गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.  

पुरस्कार

2022 आणि 2023 च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे 2022 आणि 2023 या वर्षांसाठीचे ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ प्रदान केले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला तसंच कठपुतळी आणि संबंधित नाट्य कला प्रकारात 1952 पासून हे पुरस्कार दिले जातात. मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि भारतीय शास्त्रीय संगीतातल्या नामवंत गायिका देवकी पंडित आणि  कलापिनी कोमकली यांनाही हा  पुरस्कार मिळाला आहे.
1 लाख रुपये, ताम्रपट आणि महावस्त्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे. त्याखेरीज नामवंत कलाअभ्यासकांना ‘संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती’ने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ कला अभ्यासक विनायक खेडेकर यांचा त्यात समावेश आहे. 3 लाख रुपये आणि ताम्रपट असं गौरववृत्तीचं स्वरुप आहे. प्रत्येकी 25 हजार रुपये आणि ताम्रपट या स्वरुपाचे युवा पुरस्कार 80 उदयोन्मुख कलाकारांना मिळाले आहेत.  

क्रीडा घडामोडी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात विदर्भाकडून मध्य प्रदेशचा पराभव
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव केला. नागपूर इथं झालेल्या या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात 170 धावा केल्या. मध्य प्रदेशनं  पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या. मात्र विदर्भ संघाने दुसऱ्या डावात 402 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. आणि मध्य प्रदेशचा डाव मात्र 258 धावात गुंडाळला. विदर्भ आणि मुंबई यांच्यात येत्या 10 तारखेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment