5 March Current Affairs Notes | 5 मार्च चालू घडामोडी नोट्स

5 मार्च चालू घडामोडी नोट्स


राष्ट्रीय घडामोडी

हिसारमधल्या जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीमध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातल्या पहिल्या हरित हायड्रोजन प्रकल्पाला सुरुवात
हिसारमधल्या जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीमध्ये देशातला स्टेनलेस स्टील क्षेत्रातल्या पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू झाला आहे. केंद्रीय पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्याचं उद्घाटन केलं. हा स्टेनलेस स्टील क्षेत्रातला जगातला पहिला सार्वजनिक ग्रिडबाहेरचा, हरित हायड्रोजन प्रकल्प असेल. तसंच छतावर मोठी सौरयंत्रणा उभारलेलाही जगातला हा सर्वांत पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे दर वर्षी कार्बन उत्सर्जन दोन हजार सातशे टनांनी, तर पुढच्या दोन दशकांमध्ये हे उत्सर्जन ५४ हजार टनांनी कमी होणार आहे. 
या प्रसंगी बोलताना शिंदे यांनी पर्यावरणपूरक आणि शाश्वत भविष्यासाठीची देशाची कटिबद्धता अधोरेखित केली. कोविडनंतरच्या काळात जबाबदार आर्थिक प्रगतीची गरज निर्माण झाल्याचंही ते म्हणाले. पोलाद क्षेत्रात भारताची वाटचाल आयातदाराकडून निर्यातदार बनण्याकडे झाल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि कच्च्या लोखंडाच्या क्षेत्रात भारताला जगातील सर्वांत मोठा उत्पादक बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. 

आर्थिक घडामोडी

मुंबईत मनोरंजन उद्योगविषयक फिक्की फ्रेम्स या परिषदेचा प्रारंभ
देशातला चित्रपट आणि मनोरंजन उद्योग भारतातच नव्हे तर जगात नवनिर्मिती, सांस्कृतिक संपन्नता आणि कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. OTT मुळं या उद्योगात मोठे बदल झाले असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आज म्हणाले. राज्याचे कौशल विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत आज फिक्की फ्रेम्सला सुरुवात झाली. त्यात उद्घाटनपर सत्रात ते बोलत होते. भारतात मोठ्या बजेटचे चित्रपट तयार करण्यासाठी परदेशी दिग्दर्शकांची गरज आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारने चित्रपट आणि मनोरंजन उद्योगासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी दिली. उद्योगाला आवश्यक कौशल्यांची माहिती त्यांनी सरकारला द्यावी. फिक्कीसोबत यासाठी काम करण्याची तयारी असल्याचं राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी म्हणाले. कोरोनाकाळात निर्माण झालेल्या मंदीतून हा उद्योग पूर्णपणे बाहेर पडला असल्याचं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी या परिषेदत म्हणाले. या उद्योगाच्या सर्वच क्षेत्रात वृद्धी होत असून एकमेकांशी त्यांची स्पर्धा नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

जागतिक घडामोडी

गर्भपाताचा संवैधानिक अधिकार देणारा फ्रान्स हा जगातला पहिला देश
फ्रान्सनं देशाच्या घटनेत गर्भपाताचा अधिकाराचा समावेश केला आहे. गर्भपाताचा संवैधानिक अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रान्स संसदेनं यासाठी घेतलेल्या विशेष अधिवेशन झालं. त्यात घटनेत हा बदल करण्यासाठी मतदान झालं. त्यात ७८० विरुद्ध ७२ अशा बहुमतानं हा निर्णय घेण्यात आला. यामुळे फ्रान्सच्या घटनेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्याचा मार्ग मोकळा झाला.
फ्रान्सच्या घटनेत झालेला हा बदल ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रती एमॅन्युअल मॅक्रो यांनी व्यक्त केली आहे. घटनेत हा महत्त्वाचा बदल झाल्यानं येत्या शुक्रवारी असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी विशेष कार्यक्रम होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
फ्रान्समध्ये गर्भपाताच्या अधिकारांना पाठिंब्याचा मोठा इतिहास आहे. १९७५ मध्ये गर्भपात करण्यासाठी एक कायदा तयार करण्यात आला. या कायद्याला पाठिंबा देणाऱ्या  तत्कालीन आरोग्यमंत्री सायमन वेल यांचं नाव दिलं होतं. या कायद्यामुळे दहा आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी होती. २००१ मध्ये ही परवानगी १२ आठवडे आणि त्यानंतर २०२२ मध्ये १४ आठवड्यांपर्यंत ही परवानगी वाढवली आहे.

महाराष्ट्र घडामोडी

लेक लाडकी योजनेसाठी 19 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वितरीत
लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर हे अनुदान देण्यात येणार आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत ३६ जिल्ह्यात १९ कोटी ७० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हा स्तर तसंच तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान
राज्यात नुकत्याच राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचे पुरस्कार काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या अभियानादरम्यान राबवण्यात आलेल्या तीन उपक्रमांची ‘गिनीज बुक मध्ये नोंद झाली, याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. या विक्रमांमध्ये १३ लाख ८४ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ घेणं, ११ लाख २० हजार ३८६ विद्यार्थ्यांनी २४ तासांच्या कालावधीत शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय आणि फोटो बेसपोक प्लॅटफॉर्मवर अपलोड करणं, तसंच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाचनाचं महत्त्व सांगणारा यूट्यूब वरचा व्हिडीओ, एकाच वेळी एक लाख ८९ हजार ८४६ विद्यार्थी आणि पालकांनी लाईव्ह पाहणं, या उपक्रमांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त शाळांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल तसंच छत्रपती संभाजीनगर येथील भोंडवेपाटील शाळेचा समावेश आहे.

संरक्षण घडामोडी

नौदलाची उच्चस्तरीय परिषद आजपासून
भारतीय नौदलाची यावर्षाची तीन दिवसीय उच्च स्तरीय परिषद आजपासून सुरू झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्घाटन सत्राला संबोधित करतील. या वेळी  नौदलाच्या ‘ट्विन कॅरियर ऑपरेशन्स’ आयोजित विमानवाहू जहाजांचं  प्रदर्शनदेखील  होणार आहे. यावेळी भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेच्या प्रमुखांसह संरक्षण कर्मचारी नौदल अधिकाऱ्यांबरोबर  सागरी सुरक्षेशी संबंधित धोरणात्मक, आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा करतील. 

क्रीडा घडामोडी

बी साई प्रणीतनं आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून घेतली निवृत्ती
भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतनं आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. टोकियो ऑलिम्पिकपासून दुखापतीनं त्रस्त असल्यानं वयाच्या ३१ व्या वर्षी त्यानं हा निर्णय घेतला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं कांस्यपदक जिंकलं असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. याशिवाय २०१७ मध्ये त्यानं सिंगापूर खुली स्पर्धीही जिंकली होती. 

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment