
4 मार्च चालू घडामोडी नोट्स
राष्ट्रीय घडामोडी
देशातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचं केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
हरयाणातल्या हिसार येथे देशातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचं आज केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. जिंदाल स्टेनलेस स्टील लिमिटेडच्या आवारात हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रति वर्ष दोन हजार सातशे मेट्रिक टन तर येत्या 20 वर्षात 44 हजार टनाने कमी उत्सर्जन होणार आहे.
हरित आणि शाश्वत भवितव्यासाठी भारत वचनबद्ध असून कोविड नंतरच्या युगात जबाबदार आर्थिक विकासाची गरज असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. भारताने पोलाद आयातदार ते पोलाद निर्यातदार अशी प्रगती केली असून कच्च्या पोलादाचे उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठा देश बनण्याचे उद्दिष्ट भारतानं ठेवले आहे असे ते म्हणाले. गेल्या वर्षी राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मोहिमेची सुरुवात झाली.
दिल्ली विधानसभेत 2024-25 या वर्षासाठीचा 76 हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर
दिल्ली विधानसभेत आज अर्थमंत्री अतिशी यांनी २०२४-२५ या वर्षासाठीचा ७६ हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीच्या तरतुदीत ११ टक्के कपात केल्याची माहिती त्यांनी दिली. रामराज्याचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न दिल्ली सरकार करत असल्याचं अतिशी यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर विधानसभेत सात अब्ज रूपयांहून अधिक पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली.
आर्थिक घडामोडी
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन.
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते नवी दिल्लीत राज्य तसेच केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी प्रमुखांच्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन.
वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी यंत्रणा बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल म्हणून अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महसूल विभागाने ही परिषद आयोजित केली आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हे देखील या परिषदेला उपस्थित आहे वस्तू आणि सेवा कर चुकवेगिरीला आणि बनावट पावत्यांना त्यांना आळा घालणे सर्वोत्तम पद्धती सामायिकरण करणे समन्वय वाढवणे, तंत्रज्ञान आणि डेटा यांची सांगड घालणे, व्यवसाय सुलभीकरण आणि प्रभावी प्रतिबंधात्मक अंमलबजावणी उपाय यांचा सुवर्णमध्य गाठणे या मुद्द्यांवर या परिषदेत सांगोपांग चर्चा अपेक्षित आहे.
संरक्षण घडामोडी
एमएच 60 आर सीहॉक या बहुउपयोगी हेलिकॉप्टर्सचा येत्या बुधवारी नौदलाच्या ताफ्यात होणार समावेश
एमएच 60 आर सीहॉक या बहुउपयोगी हेलिकॉप्टर्सचा येत्या बुधवारी नौदलाच्या ताफ्यात समावेश होणार आहे. कोची इथल्या आयएनएस गरुड या नौदलाच्या हवाई तळावर हा कार्यक्रम होईल. भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या अत्याधुनिकतेतला हा महत्त्वाचा टप्पा असेल.
आयएनएएस 334 या नावानं सीहॉक्सचं हे पथक भारतीय नौदलात समाविष्ट केलं जाईल. सी हॉक्सच्या समावेशामुळे देशाच्या सागरी संरक्षण सज्जतेत लक्षणीय वाढ झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पाणबुडी विरोधी कारवाई, समुद्राच्या पृष्ठभागावरील युद्ध, शोध आणि बचाव कार्य, जखमींची सुटका इत्यादी कामांसाठी या हेलिकॉप्टर्सची रचना करण्यात आली आहे. अमेरिकेतून आयात केलेल्या या हेलिकॉप्टर्सची भारतीय उपखंडातल्या कार्यक्षमतेसाठी काटेकोर तपासणी करण्यात आली आहे.
डिफकनेक्ट 2024 या संरक्षणविषयक कार्यक्रमाचे नवी दिल्लीत आयोजन.
नवी दिल्लीत होणाऱ्या डिफकनेक्ट 2024 या संरक्षणविषयक कार्यक्रमाचे उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशाची तंत्रज्ञानाची बाजू मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेण्याच्या उद्देशाने सरकारने अदिती आणि आयडेक्स सारख्या योजना सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षणविषयक स्वदेशी नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लष्कराच्या तिनही दलांबरोबरच संरक्षण सामग्री उद्योजक, स्टार्ट अप्स, तज्ञ आणि धोरणकर्ते यामध्ये सहभागी झाले आहेत. संरक्षण क्षेत्रातले सहकार्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने एक मंच उभारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण सर्वोत्कृष्टतेसाठी नवकल्पना – संरक्षण संशोधन संस्था अर्थात आयडेक्स डीआयओ या संस्थेने संरक्षण उत्पादन विभागाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 2018 मध्ये आयडेक्सची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातल्या तंत्रज्ञान विकास तसेच सहकार्यासाठी आयडेक्स ही संस्था काम करते.
कल्पकम येथे 500 मेगावॅट क्षमतेच्या देशी बनावटीच्या अणुभट्टीची पायाभरणी
प्रधानमंतत्री नरेंद्र मोदी यांनी आज 500 मेगावॅट क्षमतेच्या देशी बनावटीच्या अणुभट्टीची पायाभरणी केली. कल्पकम येथे भाविनी अर्थात भारतीय नभिकिय विद्युत निगम लिमिटेड ही कंपनी ही अणुभट्टी विकसित करत आहे. त्यासाठी भाविनीला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह 200 कंपन्या मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी कार्यक्रमाला उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
शेहबाझ शरीफ यांनी घेतली पाकिस्तानचे 24 वे प्रधानमंत्री म्हणून शपथ
पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ गटाचे नेते शेहबाझ शरीफ यांनी आज पाकिस्तानचे 24 वे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती निवासस्थान असलेल्या ऐवान-ए-सदर येथे शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शरीफ यांना शपथ दिली. दरम्यान पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ कडून देशाच्या विविध भागांमध्ये निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र घडामोडी
‘ॲडवांटेज चंद्रपूर’मधे पहिल्याच दिवशी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार
‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे या 2 दिवसीय कार्यक्रमाचे आज वन अकादमी चंद्रपूर येथे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी 19 उद्योजकांनी सुमारे 1 लाख कोटींचे सामंजस्य करार केले. मित्तल समूह चंद्रपूर जिल्ह्यात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या सर्व उद्योगांच्या माध्यमातून सुमारे एक लाख नवीन रोजगारांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात येत्या काळात विमानतळाची उभारणी होणार असल्याची माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
कल्याण आणि तळोजा या मेट्रो मार्ग 12 च्या कामाचा शुभारंभ
मुंबई महानगर प्रदेशातल्या कल्याण आणि तळोजा या दोन महत्त्वपूर्ण शहरांना जलदगतीनं जोडण्याच्या दृष्टीने मेट्रो मार्ग 12 च्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी केला. ही मेट्रो मार्गिका मुंबई महानगर प्रदेशातील दक्षिण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई, विरार, मीरा-भाईंदर शहरांना जोडून असून एक नवी आणि पर्यावरणपूरक अशी वाहतूक प्रणाली उदयाला येणार आहे. कल्याण ते तळोजा दरम्यान प्रवासाच्या वेळत 45 मिनिटांची बचत होणार असून हा प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन केले असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा` उपक्रमाची पारितोषिकं घोषित
राज्यातल्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाची पारितोषिकं, काल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषित केली. शासकीय शाळा गटात प्रथम पारितोषिक वाशिम जिल्ह्यातल्या साखरा जिल्हा परिषद शाळेला, द्वितीय रायगड जिल्ह्यात हेदवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला, तर तृतीय पारितोषिक सांगली जिल्ह्यात घालेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेला जाहीर झालं आहे. खाजगी शाळा गटात प्रथम क्रमांक नाशिक जिल्ह्यातल्या एस्पेलियर हेरिटेज स्कूल, द्वितीय पुणे जिल्ह्यातल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन आणि तृतीय क्रमांक छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर इथल्या भोंडवे पाटील शाळेनं पटकावला आहे. उद्या मुंबईत या पारितोषिकांचं वितरण होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत, 1 लाख 3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या होत्या.
समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण
समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे आज सार्वजनिक बांधकाममंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हा टप्पा सुरु झाल्याने ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी ही प्रवासी वाहतूक, तसंच शिर्डी, अहमदनगर आणि नाशिकमधल्या सिन्नर तसेच इगतपुरी परिसरातल्या शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने होणारी मालवाहतूक सुलभ आणि जलद होईल. या टप्प्याच्या लोकार्पणानंतर समृद्धी महामार्गावरच्या 701 किलोमीटर मार्गापैकी वाहतुकीसाठी उपलब्ध मार्ग 625 किलोमीटरचा होणार आहे.
या तिसऱ्या टप्यात विविध मार्गिका आणि दारणा नदीवरच्या एका मोठ्या पूलासह 8 छोटे पूल, विविध 13 भुयारी मार्ग, 14 टोलबूथ या आणि अशा इतर सुविधांचा समावेश आहे.
राज्यातल्या पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या पोलिओ लसीकरणाला प्रारंभ
‘दो बूंद जिंदगी के’ या अभियानाचे फलित म्हणजे मार्च 2014 मध्ये भारतातून पोलिओचे उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमाणपत्र मिळाले. मात्र तरीही पोलिओचा एकही रुग्ण देशात राहू नये, यासाठी दर वर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातल्या प्रत्येक बालकाला पल्स पोलिओचे डोस देण्यात येतात.
क्रीडा घडामोडी
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईचा तमिळनाडूवर 1 डाव आणि 70 धावांनी विजय
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबईनं आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच तमिळनाडूवर 1 डाव आणि 70 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात तमिळनाडूचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 146 धावात गुंडाळल्यानंतर, मुंबईनं पहिल्या डावात 378 धावा केल्या. या डावात मुंबईला 232 धावांची आघाडी मिळाली. आज तमिळनाडूचा दुसरा डाव 162 धावांवर आटोपला. मुंबईतर्फे शम्स मुलानीनं 4 गडी बाद केले. 109 धावा करणारा, आणि दोन्ही डावांमधे मिळून 4 गडी बाद करणारा मुंबईचा शार्दुल ठाकूर सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.