जागतिक वन्यजीव दिन – 3 मार्च
दरवर्षी 3 मार्च रोजी जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील जैवविविधता जपण्यासाठीची जनजागृती करण्याकरता हा दिन साजरा करण्यात येतो. ‘लोकांना ग्रहाबरोबर जोडणे’ आणि ‘वन्यजीव संवर्धनात डिजीटल संशोधनाचा वापर’ अशी या दिनाची यावर्षाची संकल्पना आहे.
भारताचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव हे आहेत.
MH 60R Seahawk मल्टी-रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदल येत्या बुधवारी कार्यान्वित करणार
कोची येथील INS गरुडा इथं नव्यानं दाखल झालेले MH 60R Seahawk मल्टी-रोल हेलिकॉप्टर, भारतीय नौदल येत्या बुधवारी कार्यान्वित करणार आहे. भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणाच्या प्रवासातला हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात सीहॉक्स स्क्वॉड्रन INAS 334 म्हणून कार्यान्वित केले जाईल. ही हेलिकॉप्टर्स फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिका सरकारसोबत झालेल्या 24 विमानांच्या विदेशी लष्करी विक्री कराराचा एक भाग आहेत. तसेच
सीहॉक्सच्या समावेशासह आपल्या सागरी पराक्रमाच्या लक्षणीय वाढीचा, भारतीय नौदल साक्षीदार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे. पाणबुडीविरोधी युद्ध, पृष्ठभागविरोधी युद्ध, शोध आणि बचाव, वैद्यकीय स्थलांतर आणि पुन्हा तैनात करण्यासाठी हेलिकॉप्टर डिझाइन केलेले आहे.
पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदावर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शहबाज शरीफ यांची निवड
पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदावर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शहबाज शरीफ यांची निवड झाली आहे. यासाठी आज झालेल्या निवडणुकीत त्यांना 201 मते मिळाली, तर इम्रान खान यांचं समर्थन असलेल्या पीटीआयचे उमेदवार ओमर अयूब खान यांना 92 मते मिळाली. प्रधानमंत्री पदासाठी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल शहबाज शरीफ यांनी त्यांना पाठिंबा दिलेल्या सगळ्यांचे आभार मानले. या निवडणुकीच्या वेळी पाकिस्तानच्या संसदेत गदारोळ झाला. पीटीआयचे समर्थन असलेल्या खासदारांनी इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी केली, तसेच शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.
आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर
आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतक्त्यात भारताने न्यूझीलंडला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. वेलिंग्टन येथील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर विजय मिळवल्याने, न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. सध्या गुणतालिकेत भारत विजयाच्या 64.58 टक्केवारीसह पहिल्या, 60 टक्क्यासह न्यूझीलंड दुसऱ्या आणि 59.09 टक्केवारीसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 3:1असा आघाडीवर असून, मालिकेतला शेवटचा सामना जिंकला तर गुंततक्त्यातील भारताचे पहिले स्थान आणखी मजबूत होईल.
‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियानात वाशिम जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक
राज्यातल्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातल्या राज्यस्तरीय पारितोषिकांची घोषणा आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. राज्यस्तरीय शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातल्या साखरा येथील जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक, रायगड जिल्ह्यातल्या हेदवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला द्वितीय तर सांगली जिल्ह्यातल्या घालेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.
खाजगी शाळा गटात नाशिक, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर येथील शाळांचा समावेश आहे. पारितोषिक प्राप्त शाळांना 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या उपक्रमांत एक लाख तीन हजार 312 शाळा सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी तसंच शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम नियमितपणे राबवण्यात येईल, असं केसरकर यांनी या वेळी सांगितले. वाचन चळवळीमध्ये 18 लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञा मध्ये सहभाग घेतला असून याची दखल गिनीज बुक मार्फत घेण्यात आली असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
चंद्रपूर येथे 1 ते 3 मार्च दरम्यान तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू
वन्यजीवांचं संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी राज्यातल्या सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प असलेल्या चंद्रपूर येथे 1 ते 3 मार्च दरम्यान तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू आहे. संपूर्ण जगाला वन्यजीव संरक्षण शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा याचे महत्त्व जगासमोर मांडण्याचे कार्य राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा महोत्सवाच्या माध्यमातून जगासमोर जात आहे.
आज समारोपीय कार्यक्रमात, प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी, क्लासिकल गंगा बॅलेट हा नृत्य अविष्कार सादर करणार आहे. कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या तीन दिवसीय कार्यक्रमात सिने अभिनेत्री आणि वन्यजीव सदभावना दूत रविना टंडन, मिस वर्ल्ड स्पर्धेतील 10 देशाच्या प्रतिनिधी, प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल, संगीतकार रिकी केज, यांच्यासह प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचा कविसंमेलन असे विविधरंगी कार्यक्रम झाले.
नाशिक विभागातली पहिली ‘मदर मिल्क बँक’ जळगावात
जळगाव येथील जिल्हा रुग्णालयातली ‘मदर मिल्क बँक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. नाशिक विभागातली पहिली अशी ही मदर मिल्क बँक नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले. शिशुंना आईचेच दूध मिळावे या दृष्टीने मदर मिल्क बँक जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून साकारण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
जगातल्या स्पॅनिश भाषक देशांमध्ये भारताच्या औषधीकोशाला मान्यता देणारा निकारागुवा पहिला देश
जगातल्या स्पॅनिश भाषिक देशांमध्ये भारताच्या औषधीऔषधीकोशाला मान्यता देणारा निकारागुवा हा पहिला देश ठरला आहे. भारत आणि निकारागुवा यांनी औषध नियंत्रणाच्या संदर्भातल्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारानुसार भारतात आयात होणाऱ्या सर्व औषधांनी भारतीय औषधीकोशाच्या मानकांचे पालन केले पाहिजे.
याआधी अफगाणिस्तान, नेपाळ, घाना , मॉरिशस आणि सुरिनाम या देशांनी भारतीय औषधीकोशाला मान्यता दिलेली आहे.
जीएसटी महसूलात 12.5 टक्क्यांनी वाढ
फेब्रुवारी महिन्यात 1 लाख 68 हजार 337 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात साडेबारा टक्के वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवहारातून GST मध्ये झालेली 14 टक्के वाढ आणि वस्तूंच्या आयातीमधल्या GST मधून झालेली साडेआठ टक्के वाढ यामुळे ही वाढ दिसून आली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साडे तेरा टक्क्यांनी वाढ होऊन GST परताव्याची रक्कम दीड लाख कोटी रुपये झाली आहे. या वर्षी फेब्रुवारीपर्यंत, चालू आर्थिक वर्षातील एकंदर GST संकलन 18 लाख कोटी रुपये असून ते 2022-23 च्या संकलनापेक्षा 11 पूर्णांक 7 दशांश टक्क्यांनी जास्त आहे. 2023-24 साठी सरासरी मासिक सकल संकलन 1 लाख 67 कोटी रुपये आहे. गतवर्षी ते दीड लाख कोटी रुपये होते.
केंद्र सरकार, त्रिपुरा राज्य सरकार आणि त्रिपुरा मोठा यांच्यात त्रिपक्षीय करार
केंद्र सरकार, त्रिपुरा राज्य सरकार आणि त्रिपुरा मोठा नावाने परिचित असलेली स्वदेशी पुरोगामी प्रादेशिक आघाडी यांनी आज नवी दिल्लीत त्रिपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि त्रिपुरा मोठाचे अध्यक्ष प्रद्योत देब्बारमा यावेळी उपस्थित होते. या करारानुसार स्थानिक जनतेचे इतिहास, भूमी आणि राजकीय अधिकार, आर्थिक विकास, ओळख, संस्कृती आणि भाषेशी संबंधित समस्या खेळीमेळीच्या वातावरणात सोडवण्यावर भर देण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बंडखोरी मुक्त, हिंसाचार मुक्त आणि विवाद मुक्त ईशान्य प्रदेशाचा दृष्टिकोन सत्यात उतरण्यासाठी अनेक प्रयत्न झाल्याचं शाह यांनी यावेळी सांगितले. 10 हजाराहून अधिक जण शस्त्रास्त्राचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील झाल्याने ईशान्येत विकासाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ग्रीनफिल्ड प्रकल्पांचे उद्घाटन.
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते काल नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात औषधे आणि वैद्यकीय उपकरण उत्पादनाकरता प्रोत्साहनयोजने अंतर्गत ग्रीनफिल्ड प्रकल्पाचे उद्घाटन केले. यात घाऊक औषध निर्मितीचे 22 आणि विविध प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीशी संबंधित 39 प्रकल्प आहेत. लेव्होफ्लॉक्सासिन, ऑफलोक्सासिन, टेल्मिस्ट्रान, व्हिटॅमिन बी 6 आणि डायक्लोफेनाक सोडियम यासह इतर औषधांचा समावेश आहे. सीटी स्कॅन आणि एमआरआय, कॅथ लॅब आणि अल्ट्रासोनोग्राफी, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स, इंटेन्सिव्ह केअर व्हेंटिलेटर, डायलिसिस मशीन आणि स्टेंट अशा स्वरूपाच्या वैद्यकीय उपकरणांचादेखील यात समावेश आहे.