29 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
देशातल्या एक कोटी घरांना छपरावर सौर उर्जानिर्मिती संच बसवण्यासाठीची योजना, पीएम सूर्य – घर मुफ्त बिजली योजनेला केंद्रसरकारने मंजुरी दिली आहे. त्याकरता 75 हजार 21 कोटी रुपये खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमप्रतिनिधींना ही माहिती दिली. या योजनेच्या लाभार्थी घरांना 300 एकक वीज मोफत मिळणार असून अतिरिक्त विजेच्या विक्रीतून 15 हजार रुपये कमावण्याची संधी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या 13 फेब्रुवारीला योजनेचे उद्घाटन झाले होते.
चालू वर्षातल्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पलाश खतांच्या पोषण मूल्य आधारित अनुदानाचे दरही सरकारने मंजूर केले आहेत. त्याशिवाय आणखी 3 खतश्रेणींचा/ प्रकारांचा समावेश अनुदान योजनेत करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. व्याघ्रप्रजातींच्या संरक्षण संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना करण्याला आणि त्याकरता 2027-28 या वर्षापर्यंत दीडशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याच्या प्रस्तावाला ही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते. देशात सेमीकंडक्टर उत्पादन कारखाने सुरु करण्यात येणार असून त्यातला पहिला गुजरातमधे धोलेरा येथे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी
राष्ट्रपती मुर्मू येत्या मंगळवारी पहिला पेय जल सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करणार.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या मंगळवारी नवी दिल्लीत पहिला पेय जल सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करणार आहेत. नवी दिल्लीत आज बातमीदारांना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांनी ही माहिती दिली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल शहरे आणि राज्यांना सन्मानित केले जाणार आहे. सुवर्ण ,रौप्य सिल्व्हर आणि कांस्य पासून विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलं 10 इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज प्रणालीचं उद्घाटन.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज 10 इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज प्रणालीचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उदघाटन केलं. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या लँड कस्टम स्टेशन्सवर हे उद्घाटन करण्यात आलं असून यामुळे ईशान्य भागात व्यवसाय सुलभ होण्याला मदत होणार आहे.
आसाममधल्या गोलकगंज आणि करीमगंज स्टीमर घाट; बागमारा, भोलागंज, बोरसोरा, डवकी, घासुपारा आणि मेघालयामधे शेला बाजार, या ठिकाणी ही प्रणाली कार्यरत होणार आहे. यामुळे कागदविरहित व्यवस्थापन त्याचप्रमाणे शुल्क आणि परतावाही सहज सुलभ होईल. त्यानंतर त्यांनी 1818 साली तयार करण्यात आलेली दुर्बिण पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केली.
जलशक्ती मंत्रालयाचा नदी खोरे व्यवस्थापन सहकार्यासाठी 12 संस्थांसोबत करार.
जलशक्ती मंत्रालयानं सहा नद्यांच्या खोऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी शैक्षणिक आणि संशोधनात्मक सहकार्यासाठी बारा तंत्रज्ञान शिक्षण संस्थांबरोबर करार केला आहे. नर्मदा, गोदावरी, महानदी, कृष्णा, कावेरी आणि पेरियार या नद्यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेअंतर्गत हा करार करण्यात आला.
जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, की गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारनं केलेल्या उत्तम नियोजन आणि अंमलबजावणीमुळे युनेस्कोनं जगातल्या सर्वांत उत्कृष्ट दहा पुनरुज्जीवन आणि संरक्षण योजनांमध्ये नमामी गंगे योजनेचा समावेश केला आहे. नद्यांविषयी राज्याराज्यांमध्ये सहकार्य आणि समन्वय गरजेचा आहे, असं मत शेखावत यांनी या प्रसंगी व्यक्त केलं.
एनजीईएल कंपनीचा महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीसोबत करार.
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजे एनटीपीसीच्या एनटीपीसी हरित ऊर्जा मर्यादित म्हणजे एनजीईएल या कंपनीने महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीशी म्हणजे महाजेंकोशी नवीकरणीय ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी करार केला आहे. या संयुक्त कराराअंतर्गत तयार होणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे.
एनटीपीसीच्या दिल्ली मुख्यालयात महाजेंकोचे संचालक अभय हरणे आणि एनजीईएलचे मुख्य महाव्यवस्थापक व्ही. व्ही. शिवकुमार यांनी सह्या केल्या. एनटीपीसीचं 2032 पर्यंत एकंदर 60 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जेच्या निर्मितीचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी सध्या सुमारे साडेतीन गिगावॉट क्षमता असून, 22 गिगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारले जात आहेत.
कोळसा लॉजिस्टिक योजना आणि धोरणाचा आज शुभारंभ.
केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत कोळसा पुरवठा-साखळी योजना आणि धोरणाचा शुभारंभ होणार आहे. कोळसा वाहतुकीत, प्रगत तंत्रज्ञान, किफायतशीरपणा, लवचिक, टिकाऊ आणि विश्वासार्ह प्रणाली विकसित करण्यासाठी, दूरदृष्टी ठेवून हे धोरण तयार करण्यात आलं आहे. आयात कोळशावरील अवलंबित्व कमी करून, आर्थिक वर्ष 2030 पर्यंत या क्षेत्रातील मागणी आणि पुरवठ्याचा समतोल साधत आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट गाठणे हा या आराखड्याचा उद्देश आहे.
विविध उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मेरा पहला वोट देश के लिए मोहीमेचं आयोजन
नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. देशभरातल्या विविध उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करून राष्ट्रहितासाठी मतदानाचं महत्त्व पटवून देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. कालपासून सुरू झालेली ही मोहीम येत्या ६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तरुणांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व उच्च शिक्षण संस्थांनी वेबिनार आणि सेमिनार आयोजित करावेत असं विद्यापीठ आयोगाने सांगितलं आहे.
एस. चोकलिंगम यांची राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती.
केंद्रीय निवडणूक आयोगानं १९९६ च्या सनदी सेवेचे अधिकारी एस. चोकलिंगम यांची राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सनदी अधिकारी श्रीकांत देशपांडे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
राज्य सरकारनं माजी सनदी अधिकारी प्रदीप व्यास, शेखर चन्ने आणि मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. ३ वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती झाली आहे.
आशी चौकसेचा महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात नवा जागतिक विश्वविक्रम.
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या सराव सामन्यात आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात नवीन जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तिनं आधीच्या विक्रमापेक्षा एका अंकानं वाढ नोंदवत ५९७ अंकांसह हा नवा विक्रम केला आणि भोपाळ इथं मध्यप्रदेश राज्य शुटींग अकादमी रेंजमध्ये आशी चौकसेनं ४६१ पूर्णांक ८ गुणांनी ही स्पर्धा जिंकली आहे. आशी सध्या महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजीशन स्पर्धेत राष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, या स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल स्पर्धेत अर्जून बाबुतानं २५२ पूर्णांक ५ गुण मिळवत पहिलं स्थान पटकावलं आहे.
ब्रिटनच्या राजाकडून मानद नाइटहूड बहाल करणारे सुनील मित्तल हे पहिले भारतीय नागरिक
भारती उद्योगसमूहाचे अध्यक्ष सुनील मित्तल यांना ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्या हस्ते मानद नाइटहूड सन्मान मिळणार आहे. हा सन्मान मिळणारे ते पहिलेच भारतीय आहेत. ब्रिटनतर्फे परदेशी नागरिकांना त्यांच्या विशेष योगदानासाठी दिला जाणारा हा सर्वोच्च किताब आहे. भारत आणि ब्रिटनदरम्यान उद्योगविषयक सहकार्य वाढवण्यासाठी मित्तल यांनी केलेल्या कामगिरीसाठी मित्तल यांना या किताबानं गौरवण्यात येणार आहे. उभय देशांचे संबंध ऐतिहासिक असून त्यांचा आता नवीन अध्याय सुरू होत आहे, असं मित्तल यांनी निवेदनात म्हटलं आहे.