28 February Current Affairs Notes | 28 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स

संगीत नाटक अकादमीतर्फे दिले जाणारे 2022 आणि 2023 चे पुरस्कार जाहीर
संगीत नाटक अकादमीतर्फे विविध ललित कलाक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या  2022 आणि 2023 या वर्षांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर झाली आहेत.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायिका देवकी पंडित आणि कलापिनी कोमकली, सतारवादक नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण, आणि लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी यांचा पुरस्कार विजेत्यांमधे समावेश आहे. 1 लाख रुपये, ताम्रपट आणि महावस्त्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे.उस्ताद बिस्मिल्ला खान स्मृती युवा पुरस्कार 80 युवा कलाकारांना जाहीर झाले आहेत.
शास्त्रीय गायक नागेश आडगावकर, गायिका अनुजा झोकरकर, सरोदवादक सारंग कुलकर्णी, अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि प्रियंका ठाकूर यांचा त्यात समावेश आहे. 25 हजार रुपये, ताम्रपट आणि महावस्त्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे.याखेरीज ज्येष्ठ कला अभ्यासक विनायक खेडेकर आणि अन्य 5 जणांना 3 लाख रुपयांची सन्मानवृत्ती जाहीर झाली आहे.हे पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान केले जातील असे अकादमीच्या पत्रकात म्हटलं आहे.

देशभरात मेरा पहला वोट देश के लिए या कार्यक्रमचं आयोजन.
निवडणुकांमधे युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार आजपासून देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमधे मेरा पहला वोट देश के लिए हा कार्यक्रम आयोजित करत आहे. येत्या 6 मार्चपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्यातही विविध उपक्रम सुरु आहेत. सोलापूर मतदारसंघात  स्थानिक निवडणूक कार्यालयाने सायकल रॅली आयोजित केली होती.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना निर्भय आणि निर्भिडपणे मतदान करण्याची शपथ दिली. सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांना प्रमाणपत्र देण्यात आली. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयांच्या अखत्यारीतल्या नेहरु युवा केंद्राने परभणीत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी युवा मतदारांना मतदान प्रणालीचं प्रात्यक्षिक देण्यात आलं.

राज्य सरकारच्या मोदी आवास घरकुल योजनेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ.

देशातल्या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे पूर्ण हक्क देणे हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. केंद्रातून दिले जाणारे सर्व पैसे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट टाकले जातात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये म्हणाले. देशातल्या गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या विविध योजनांचं लोकार्पण करताना अतिशय आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राज्य सरकारच्या मोदी आवास घरकुल योजनेची सुरुवात झाली. याअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या १० लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ मिळेल. चालू आर्थिक वर्षातल्या अडीच लाख लाभार्थ्यांना त्यांनी निधीचं वितरण केलं.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा’ पुढचा हप्ता 88 लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रियाही प्रधानमंत्र्यांनी सुरू केली. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत बचत गटातल्या साडे पाच लाख महिलांना सव्वा आठशे कोटी रुपयाचं खेळतं भांडवल त्यांनी वितरीत केली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतल्या 6 प्रकल्पांचे आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेतल्या 45 सिंचन प्रकल्पांचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांनी आज केले.
वर्धा – नांदेड रेल्वेमार्गावरच्या वर्धा ते कळंब या 39 किलोमीटरच्या तसंच अहमदनगर-बीड-परळी मार्गावरच्या न्यु आष्टी ते बीड जिल्ह्यातल्या अमळनेरपर्यंतच्या 32 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचंही प्रधानमंत्र्यांनी लोकार्पण केलं. वर्धा-कळंब स्टेशनपर्यंतच्या नव्या रेल्वेला आणि अमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली.आयुष्मान भारत–जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातल्या एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचं वितरण करण्याची योजनाही त्यांनी सुरू केली.

सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योगांच्या उन्नतीसाठी दोन महत्वाच्या उपक्रमांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ.
मदुराई येथे काल वाहनउद्योगाशी संबंधित एका परीषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योगांच्या उन्नतीसाठी दोन महत्वाच्या उपक्रमांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रारंभ करण्यात आला. यात, TVS ओपन मोबिलिटी प्लॅटफॉर्मचा आणि रोजगार आणि उपजीविकेवरील उत्कृष्टता केंद्राचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देण्यासाठी उत्पादन आणि नाविन्य या दोन महत्त्वाच्या आणि आवश्यक बाबी आहेत असे मोदी यावेळी बोलताना म्हणाले. देशात निर्माण होणारी उत्पादनं ही जागतिक दर्जाची आणि पर्यावरणपूरक असावीत ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
जुनी वाहनं आणि त्यांच्या सुट्या भागांच्या विक्रीसाठी भारत मोठी बाजारपेठ असल्याचे सांगत, 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात लघु उद्योगांची मोठी भूमिका असेल असं ते म्हणले. कोविड काळात लघु उद्योग आर्थिक संकटात सापडले होते. त्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने अनेक पत हमी योजना सुरु केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. या उद्योगांच्या  विकासाला चालना देण्यासाठी कामगिरीशी निगडित उत्पादन उद्योगांना विशेष महत्त्व देण्यात आलं. इलेक्ट्रिक वाहने, रूफटॉप सोलर पॉलिसी, एक कोटी ई-वाहने चार्जिंग स्टेशन आणि वाहतूक क्षेत्र, या उद्योगक्षेत्रावर अवलंबून असल्याचं त्यांनी नमूद केलं. या परिषदेत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील पाच हजारांहून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमीत्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन.
आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. देशात सर्वत्र साजरा होणाऱ्या या वर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना, ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ ही आहे. ही संकल्पना भारताच्या भविष्याला आकार देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करते. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या ‘रमण इफेक्ट’ या उल्लेखनीय शोधाच्या स्मरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत, नवी दिल्ली इथे आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या शोधासाठी, डॉक्टर रमण यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या दिनाच्या औचित्त्यानं आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण आणि नावोन्मेषक विज्ञान प्रकल्पांचा समावेश आहे.

देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमधे मेरा पहला वोट देश के लिए कार्यक्रमाच आयोजन.
निवडणुकांमधे युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार आजपासून देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमधे मेरा पहला वोट देश के लिए हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. राष्ट्राच्या व्यापक हितासाठी मतदानाचं महत्त्व बिंबवणं आणि तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणं, हा कार्यक्रमामागचा उद्देश आहे येत्या 6 मार्चपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील.

आयुष मंत्रालय आणि आरआयएस यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
नवी दिल्लीत आज आयुष मंत्रालय आणि विकसनशील देशांसाठीच्या आरआयएस म्हणजेच रिसर्च ऐण्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. आयुष क्षेत्र गेल्या नऊ वर्षात आठपटीनं वाढलं आहे.या क्षेत्रामध्ये उत्तम वैद्यकीय पर्यटन केंद्र बनण्याची क्षमता असून या भागीदारीमुळं भविष्यात शैक्षणिक सहकार्य आणि सहयोग मजबूत होणार असल्याची माहिती आरआयएसचे महासंचालक सचिन चतुर्वेदी यांनी दिली.

रणजी करडंक क्रिकेट स्पर्धेत तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी नोंदवला विक्रम.
रणजी करडंक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्ध बडोदा या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्या अखेरच्या क्रमाकांवर खेळताना वैयक्तिक शतकं ठोकून काल तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी विक्रम नोंदवला. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात शेवटची फलंदाज जोडी खेळत होती.
तुषार देशपांडे 10 चौकार आणि 8 षटकारांसह 123 धावा काढून बाद झाला, तर तनुष कोटियन 120 धावांवर नाबाद राहिला.यापूर्वी 1946 मधे चंदू सरवटे आणि शुते बॅनर्जी या जोडीनं सरे संघाविरुद्ध ओव्हल मैदानावरच्या सामन्यात 10व्या आणि 11व्या क्रमांकावर खेळताना शतकं ठोकली होती.

पेरू देशात डेंग्यूचं थैमान
सर्व दक्षिण अमेरिकन देशांमध्ये डेंग्यूचा फैलाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, पेरू सरकारने आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. पेरूच्या 25 पैकी 20 प्रदेशांमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
आरोग्य आणीबाणी घोषित केल्यामुळे सरकारला डेंग्यू बाधित प्रदेशात अधिक वेगाने निधी पुरवता येणार असून, वैद्यकीय मदत  तातडीने उपलब्ध करून देता येणार आहे. 2023 पासून पेरू उच्च तापमान आणि अतिवृष्टी अनुभवत आहे. एल निनो हवामान पद्धतीमुळे, या देशाच्या किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याच्या तापमानात वाढ झाली, परिणामी डासांची उत्पत्तीत वाढ झाली.

भारतीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे यांनी भूषवलं उच्च संरक्षण समितीच्या’ बैठकीचं सहअध्यक्षस्थान.
भारतीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे यांनी काल बर्लिन मध्ये जर्मनीच्या संरक्षण सचिवां बरोबर झालेल्या दोन्ही देशांच्या ‘उच्च संरक्षण समितीच्या’ बैठकीचं सहअध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीत दोन्ही सचिवांनी  द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रांसंदर्भात विविध  मुद्द्यांवर चर्चा केली. त्यासह संरक्षण क्षेत्रातली भागीदारी वाढवण्यासाठी दोन्ही सचिवांनी भर दिला.
परस्परांच्या सीमा सुरक्षा, आगामी काळातल्या संरक्षण क्षेत्रातल्या औद्योगिक योजना तसंच संयुक्त सैन्य कवायती आदी प्रमुख मुद्द्यांवर परस्परांनी  या बैठकीत सविस्तर चर्चा केली.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment