वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी कायदा 2023 देशभरात लागू
केंद्र सरकारने ऐतिहासिक वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी कायदा 2023 आणि त्याअंतर्गतचे नियम आपल्या राजपत्रात अधिसूचित केले आहेत. हा कायदा देशभरात कालपासून लागू झाला. यामुळे आता देशातल्या वृत्तपत्रं आणि नियतकालिकांना प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणी प्रक्रिया सोपी झाल्यामुळे प्रकाशकांना आता मंजुरीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. वर्तमानपत्र आणि नियतकालिकांच्या नोंदणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे.
नमो महारोजगार मेळाव्याला बारामती येथे सुरुवात
राज्य शासनाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्याला आज दुपारी बारामती येथे सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पाच हजारांवर उमेदवारांनी नमो महारोजगार मेळाव्यात नोंदणी केली असून 254 कंपन्या रोजगार देणार आहेत. तरुणांना रोजगार मिळेपर्यंत आपण काम करत राहणार असल्याचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी म्हणले.
5 हजार कृषी उत्पादन संघटनांची उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी ओएनडीसी पोर्टलवर नोंदणी
दरम्यान, पाच हजार कृषी उत्पादन संघटनांनी आपल्या उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी खुले डिजिटल वाणिज्य नेटवर्क म्हणजे ओएनडीसी पोर्टलवर नोंदणी केली आहे तर कृषी उत्पादन संघटनांच्या विस्तारासाठी तयार केलेल्या केंद्रीय योजनेसाठी आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या संघटनांची संख्या आठ हजारपर्यंत गेल्याचंही कृषी मंत्रालयानं नमूद केलं आहे. एक हजारपेक्षा जास्त कृषी संघटनांना सुमारे 2 हजार 46 कोटी रुपयांची पतहमी देण्यात आली आहे, तिचा फायदा दहा लाखांहून जास्त शेतकऱ्यांना होणार आहे.
मेक-इन-इंडिया उपक्रमाअंतर्गत संरक्षण मंत्रालयाचे 5 खरेदी करार
मेक इन इंडिया मोहिमेला बळ देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पाच कंपन्यांसोबत 39 हजार 125 कोटी रुपयांचे खरेदी करार केले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण सचिव गिरीधर अरामाने यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून मिग-29 विमानांसाठी एअरो इंजिन्सच्या खरेदीसाठी करार करण्यात आला आहे, तर लार्सन अँड टुब्रो लिमिटेडशी उच्च क्षमतेची रडार यंत्रणा, तसेच घेराव घालण्यासाठी शस्त्र यंत्रणा यांच्या खरेदीसाठी दोन स्वतंत्र करार करण्यात आले आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या तसेच समुद्रावरून मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी ब्राह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडशी दोन करार करण्यात आले आहेत. या करारांमुळे स्वदेशी निर्मितीच्या क्षमतेला बळ मिळेल, परकीय चलन वाचेल आणि खरेदीसाठी परदेशी उत्पादकांवर अवलंबून राहणे कमी होईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हणले आहे.
श्रीलंकेत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव
कोलंबो येथील नेलमपोकुना या प्रेक्षागृहामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचा काल दूसरा दिवस होता. श्रीलंकेत पहिल्यांदाच हा महोत्सव साजरा केला जात आहे. “भगवद्गीता वैचारिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचं समर्थन करते आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा दृष्टिकोन ठेवण्याकरता प्रेरित करते” असे आंतरराष्ट्रीय गीताप्रवचनात बोलताना श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांनी सांगितले. श्रीलंकेचे बुद्धासन धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री विदुरा विक्रमनायके म्हणाले की, गीतामहोत्सव श्रीलंकेत आणण्याच्या केंद्रस्थानी सांस्कृतिक एकता आणि मुत्सद्दीपणा आहे. रामायण आणि भगवद्गीतेने आपलं बालपण घडवले.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 9 कोटींवर
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 29 फेब्रुवारीला 9 कोटींवर पोहोचली असल्याची माहिती एनएसईने दिली आहे. तर एक्सचेंजमध्ये एकूण नोंदणीकृत ग्राहक कोडची संख्या 16 कोटी 90 लाख आहे, असे एनएसईने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हणले आहे. यात आतापर्यंत केलेल्या सर्व ग्राहक नोंदणीचा समावेश आहे. ग्राहक एका वेळी अनेक ट्रेडिंग क्रमांकावरून नोंदणी करू शकतात. गेल्या काही वर्षांत नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढली असल्याचेही पत्रकात म्हणले आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये बाजारात प्रवेश केलेल्या नवीन गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक गुंतवणूकदार उत्तर भारतातले आहेत. सध्या 1 कोटी 60 लाख नोंदणीकृत गुंतवणूकदारांसह महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याखालोखाल नोंदणीकृत गुंतवणूकदार उत्तर प्रदेश आणि गुजरातमधले आहेत.
अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रारंभ
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथं अर्बन सहकारी बँकांसाठी नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रारंभ केला.
या संघटनेची स्थापना ही देशाला सहकारातून समृद्धीकडे नेत आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे या वेळी शहा यांनी सांगितलं. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक आणि मजबूत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यातून बँकांना आणि त्यांच्या ग्राहकांना फायदा होणार असल्याचंही शहा म्हणाले.
नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला बिगर-बँकिंग वित्त कंपनी म्हणून कार्य करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने नोंदणीकृत प्रमाणपत्र प्रदान केलं आहे.
जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार मंत्र्यांची 5 दिवसीय बैठक अबुधाबी येथे पार पडली.
जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार मंत्र्यांची 5 दिवसीय बैठकीचा आज अबुधाबी येथे समारोप झाला.भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे उपस्थित होते. ते 166 व्या सदस्यीय जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार मंत्र्यांच्या पाच दिवसीय बैठकीनंतर अबुधाबीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना गोयल म्हणाले की, नवी दिल्ली येथे गरिबांसाठी वितरण होत असलेल्या अन्नधान्याची खरेदी अखंडपणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे. सार्वजनिक अन्नधान्याच्या साठवणुकी संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण आणि मत्स्यपालन अनुदानावर अंकुश ठेवणे यासारख्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय न घेता WTO च्या मंत्रिस्तरीय परिषदेतील चर्चा संपली. तथापि, सदस्यांनी ई-कॉमर्स व्यापारावर आयात शुल्क लादण्यावरील स्थगिती आणखी 2 वर्षे वाढविण्यास सहमती दर्शविली.
देशातले शेअर बाजार नव्या उच्चांकांवर बंद
देशातले शेअर बाजार आज शनिवारी झालेल्या विशेष सत्रातही नव्या उच्चांकांवर बंद झाले. व्यवहारादरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेेक्सने 73 हजार 995 अंकांच्या पातळीला स्पर्श केला होता. निफ्टी 22 हजार 420 अंकांपर्यंत गेला होता. व्यवहार संपले तेव्हा सेन्सेक्स 61 अंकांनी वधारुन 73 हजार 806 अंकांवर बंद झाला. निफ्टी 40 अंकांनी वधारुन 22 हजार 378 स्थिरावला.
शनिवारी दोन्ही शेअर बाजारात सकाळी सव्वा 9 ते 10 आणि साडे 11 ते साडे 12 दरम्यान विशेष सत्र झाली. या सत्रात प्रचलित यंत्रणा बंद पडली, तर वापरण्याच्या पर्यायी यंत्रणेची चाचणी झाली.
‘केंद्र सरकारच्या पुनर्वितरण धोरणामुळं देशातील गरीबी निर्मुलनात मदत झाली’
केंद्र सरकारच्या मजबूत पुनर्वितरण धोरणामुळे देशातल्या गरीबी निर्मुलनात मदत झाल्याचे अमेरिकेतल्या ब्रूकिंग्स या संस्थेने म्हणले आहे. या धोरणामुळे गेल्या दशकभरात देशाचा सर्वसमावेशक विकास झाल्याचं संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हणले आहे. स्वच्छतागृहांची बांधणी, वीज वितरण जाळ्यात वाढ, स्वयंपाकासाठी आधुनिक इंधन आणि नळाद्वारे पाणीपुरवठा यासारख्या राष्ट्रीय योजनांचा उल्लेख यात केला आहे. जागतिक गरिबी निर्मूलनासाठी सकारात्मक परिणाम घडवण्याच्या दृष्टीने देशातल्या गरीबीत झालेली घट उत्साहवर्धक असल्याचे या अहवालात म्हणले आहे.