1 March Current Affairs Notes | 1 मार्च चालू घडामोडी नोट्स

1 मार्च चालू घडामोडी नोट्स

देशातले शेअर बाजार नव्या उच्चांकावर
स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तिमाही आकेडवारीत दिसून आलेली लक्षणीय वाढ आणि परदेशी निधीचा नव्याने आलेला ओघ, यामुळे देशातल्या बाजारांमधे आज मोठी वाढ झाली. परिणामी दोन्ही निर्देशांकांनी नव्या उंचीवर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे 1,245 अंकांची वाढ झाली आणि तो 73,745 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 356 अंकांची वाढ नोंदवत, 22,339 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधली आजची वाढ, 1.72 टक्के, तर निफ्टीतली वाढ 1.62 टक्के आहे.

कॅनडाचे माजी प्रधानमंत्री ब्रायन मुलरोनी यांंचे निधन
कॅनडाचे माजी प्रधानमंत्री ब्रायन मुलरोनी यांंचं काल निधन झालं. ते 84 वर्षांचे होते.  1984 ते 1993 या काळात ते कॅनडाचे प्रधानमंत्री होते. शीत युद्धाच्या अखेरच्या काळात त्यांच्याकडे कॅनडाची धुरा होती. 

दोन्ही सभागृहांमधे हंगामी अर्थसंकल्प मंजूर
विधानसभेत आज विरोधकांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने समाधानी नसलेल्या विरोधकांनी या हंगामी अर्थसंकल्पात सामान्यांना न्याय मिळाला नसल्याचे कारण देत सभात्याग केला. त्यानंतर लेखानुदान प्रस्ताव मंजूर झाला. राज्याचे स्थूल उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढले असून महसुली तूट नियमाबाहेर जाणार नाही, याची काळजी घेत आहोत, असं अजित पवार अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना म्हणाले. राजकोषीय तूट 2.32 टक्के इतकी मर्यादित राखली आहे. दुसरीकडे GST वसुलीत मोठी वाढ होऊन राज्याचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
राज्याला 25 टक्के मर्यादेत कर्ज घेता येते. सध्या ते 18.2 टक्के, म्हणजेच मर्यादेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याला GST मधून मिळणारे उत्पन्न 19.9 टक्के वाढले आहे. या उत्पन्नात देशात राज्य पहिल्या क्रमांकावर असून देशात राज्याचा वाटा 15.82 टक्के आहे, असे अजित पवार म्हणाले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना द्यायची नुकसानभरपाई, एक रुपयात पीक विमा, नमो शेतकरी सन्मान योजनेचा राज्याचा स्वतंत्र हिस्सा, आनंदाचा शिधा, राज्यात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना यावरच्या खर्चांमुळं वर्षभरात पुरवणी मागण्यांवरच्या रकमेत वाढ करावी लागल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

देशाचं सहकार धोरण येत्या काही दिवसात जाहीर होणार
देशाचं सहकार धोरण येत्या काही दिवसात जाहीर होईल,अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी आज पुण्यात दिली. देशात नवं सहकार विद्यापीठ स्थापन केले जाणार असून त्याबद्दलचा निर्णयही नव्या सहकार धोरणावेळीच घेतला जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था अर्थात वॅमनीकॉममध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या संगम या वसतिगृहाचं उद्घाटन वर्मा यांच्या हस्ते झालं; त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सहकार क्षेत्रामुळे देशात सर्वाधिक रोजगार निर्माण झाले असून देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचेल त्यात सहकार क्षेत्राचा वाटा मोलाचा असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

राज्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक एफडीआय आणत महाराष्ट्राने पहिले स्थान राखले कायम
राज्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक एफडीआय म्हणजेच थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्राने पहिलं स्थान कायम राखलं आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम 260 अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरच्या एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते.
राज्यात काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे, मराठवाड्यात परिस्थिती गंभीर आहे, या पार्श्वभूमीवर, पाणीसाठ्याचं नियोजन जुलै महिन्यापर्यंत करण्यात आलं असून प्रथम पिण्यासाठी पाणी, नंतर शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगासाठी पाणी अशाच सूत्रानुसार पाण्याचं वाटप करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच आटलेल्या प्रकल्पांमधून गाळ काढण्यावर भर देणार असल्याचं ते म्हणाले. महायुती सरकारच्या काळात 24 हजार पोलिसांची भरती झाली असून मराठा आरक्षणासह 17 हजार पोलीस भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

नारायण राणे यांच्या हस्ते विविध महिलाभिमुख उद्योजक प्रकल्पांचं उदघाटन
एमएसएमई,अर्थात सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे 9 व्या शक्ती आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषदेत विविध महिलाभिमुख उद्योजक प्रकल्पांचं उदघाटन केलं. राणे यांनी यावेळी पंजीकरण से प्रगती, उन्नती-उद्यमीता से प्रगती आणि WEP मेंटरशिप कार्यक्रमाचं उदघाटन केलं. अशा कार्यक्रमांमुळे महिलांची, विशेषतः एमएसएमईंच्या विकासाला आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महिलांमधल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दर वर्षी शक्ती आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषद आयोजित केली जाते. 

2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनं घोषित
भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचं घोषित केल्यानंतर आतापर्यंत 97.62 टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत, आणि आता केवळ 8 हजार 470 कोटी रुपये किमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा लोकांकडे शिल्लक असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी चलनात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांचं एकूण मूल्य 3 लाख 56 हजार कोटी इतकं होतं. तर 29 फेब्रुवारी 2024 रोजी ते 8,470 रुपयांवर घसरल्याचं यात म्हटलं आहे. दरम्यान, २ हजार रुपयांच्या नोटांची कायदेशीर वैधता अद्याप  कायम असल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रीय जन्मजात वैगुण्य जनजागृती महिन्याला आजपासून सुरुवात
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय जन्मजात वैगुण्य जागृती महिना 2024 चा आरंभ केला. ‘अडथळ्यांवर मात: जन्मजात वैगुण्य असलेल्या बालकांना सर्वसमावेशक आधार’ ही यंदाची संकल्पना आहे. राष्ट्रीय जन्मजात वैगुण्य जागृती महिन्यामध्ये आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत, जन्मजात वैगुण्य प्रतिबंध, वैगुण्य लवकर ओळखणं, वेळेवर व्यवस्थापन आणि त्याचे मनोसामाजिक परिणाम याबाबत देशभर जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातील. अनेक बालकांना जन्मजात शारीरिक वैगुण्य असतात. वेळेवर उपचार केले, तर बालकांचे त्यापासून संरक्षण करता येते.

2023-24 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनात 7.6 टक्क्यांची वाढ
2023-24 या आर्थिक वर्षामध्ये सकल देशांतर्गत उत्पादन, अर्थात जीडीपीत 7.6 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली. जीडीपीमध्ये सात टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाढ होण्याचं हे सलग तिसरे वर्ष आहे. या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ही वाढ 8.4 टक्क्यांवर गेल्याचेही मंत्रालयाने नमूद केले. आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कालावधीत जीडीपी वृद्धीचे प्रमाण 4.3 टक्के इतके होते. घरांची वाढती मागणी आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला सरकारने दिलेला पाठिंबा यामुळे 2024 या आर्थिक वर्षात बांधकाम क्षेत्रात दोन आकडी वाढ झाल्याचे, तसेच उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रानेही या तिमाहीत चांगले काम केल्याचेही मंत्रालयाने सांगितले. 

राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाचा प्रारंभ अमित शहा यांच्या हस्ते होणार
राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे होणार आहे. शहरी सहकारी बँकांसाठीची ही एकछत्री संस्था आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सहकारातून समृद्धी या ध्येयाच्या दिशेनं टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असेल. शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण हा यामागचा उद्देश आहे. यातून बँका आणि त्यांचे ग्राहक या दोघांचाही फायदा होणार आहे.

अबुधाबी येथील बी ए पी एस मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले
अबुधाबी येथील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था, म्हणजेच बी ए पी एस मंदिराचे दरवाजे आजपासून भाविकांसाठी खुले झाले. मध्य पूर्वेतले हे पाहिलेच पारंपरिक दगडी बांधकाम असलेले हिंदूंचे मंदिर आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मंदिराचं उदघाटन झाले होते. 

कोलंबोमध्ये हायब्रीड नवीकरणीय उर्जा प्रकल्पासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात 5 अब्ज डॉलरचा करार
कोलंबोमध्ये हायब्रीड नवीकरणीय उर्जा प्रकल्पासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात 5 अब्ज डॉलरचा करार करण्यात आला आहे. श्रीलंका शाश्वत ऊर्जा प्राधिकरण, भारत सरकार आणि यू सोलर क्लीन एनर्जी सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड यांच्यात हा करार करण्यात आला. जाफनाजवळील डेल्फ्ट, नैनातिवू आणि अनलाईतिवू बेटांवर हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. वीज नसलेल्या बेटांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेवर आधारित हे प्रकल्प असणार आहेत. 

कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने लघू पल्ल्याच्या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या क्षेपणास्त्राची काल यशस्वीरित्या चाचणी घेतली. ओडीशातल्या चांदीपूरच्या किनाऱ्यावर ही चाचणी झाली. हवेतल्या मानवरहित यंत्रावर या क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या हल्ला केला. 

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment